लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

अप्पा 3

दिसायला चॉकलेट हिरो आणि एकुणातच आपण कलाकार वगैरे असल्यामुळे अन गॅदरिंगा वगैरे गाजवत असल्यामुळे काही काही पोरी हटकून बोलायला वगैरे यायच्या आणि आपल्यालासुद्धा पोरी लहानपणापासूनच फार आवडत असल्यामुळे आपण मुळीच कुठल्याही मुलीला न दुखावता त्यांच्याशी सुमधूर वार्तालाप वगैरे करायचो ( किती हा मनाचा मोठेपणा ;-) )
तर वॉलमॅगजीनवर तेंव्हा "कातरवेळ" नामक कविता झळकली आणि अगदी भर रस्त्यात दोन बऱ्यापैकी सुंदर जुनीयर पोरींनी मला आवाज दिला, मग कविता खूप छान आहे, खूप आवडली अस काहीस आमचं अतिशयच प्रेमळ आणि लडीवाळ  बोलणं चाललेल असतांना मला समोरून खांदे उडवत अप्पा येतांना दिसला,
"अयं गोतम$$$" त्याच्या या पहिल्या हाकेला मी ऐकून न ऐकल्यासारखं केल्यावर, त्याने "अयं फोकनीच्या गोतमराम$$$$" अशी दणदणीत हाक हाणली,
( हा प्राणी मज कधी गोतम, कधी गोतमराम कधी गोतम-गोईंदा तर कधी गोतम गंभीर असल्या विशेषणाने संबोधित असे,आमच्या तीर्थरूपाच्या नावाची एव्हढी क्रूर चीरफाड कुणीसुद्धा केली नसेल).
त्याच्या या प्रेममधुर हाकेने त्या सफरचंदी गालाच्या पोरी बावरल्या आणि माझ्या स्टमकमध्ये एकाएकी डचमळून आलं.
मी केविलवाणं वगैरे हसून कुठं निघालास अस विचारलं असता,
"रात्री रवीनाची डिलीव्हरी झाली अन तिच्या दुधाचा खरवस घेऊन दादा येतोय" अस मला उत्साहात सांगून तो लगबगीन निघूनही गेला.
हे ऐकल्यावर बिच्याऱ्या पोरी विचित्र लालेलाल,कावऱ्या अधिक  बावऱ्या होऊन निरोप घेत्या झाल्या.
तर अप्पाकड साताठ म्हशी होत्या आणि प्रत्येकीच नावं माधुरी,करिश्मा वगैरे.
म्हणजे अख्ख्या बॉलीवुडचं सौंदर्य अप्पाच्या गोठ्यात नांदत होत, त्याच्या तळ्यात डुंबून चिखलाने शिरबीड होत होतं.आणि विशेष म्हणजे त्याच्या रेड्याचं नाव होत महंमद अली.
कॉलेज सुटल्यावर मुन्नाभाऊच्या टपरीवर सामुहीक चहापान आटपल्यावर टॉवल आणि बनियानवर अप्पा हॉस्टेलच्या गेटपुढच्या बेंचवर बसून गाणं म्हणतं रहायचा अर्थात येणाऱ्या जाणाऱ्याची विनाकारणं छेड काढणं हेही त्यात समाविष्ट असायच
म्हणजे "छानसी म्हेबुबा हो मेरी कब ऐसा मेने सोचा था" हे गाणं गुनागुणतांना समोरून जर मेकचा सुध्या येतांना दिसला तर "हे कोळश्याच्या खाणीतून नाही बर कॉलेजमधूनच आलय, बिच्याऱ्याचा रंगच तसा आहे, आता असता भौ डोंबळे लोकं जगात" अस हटकून बाजूच्याला बोलणारं. किंवा काळे नामक विद्यार्थी येतांना दिसल्यास "हम काळे है तो क्या हुवा दिळवाळे हे" असं बोंबलणार.
काहीएक घेणंदेणं नसतांना येणाऱ्या जाणाऱ्याला भाबडेपणान छेडणं हे वैशिष्ट अप्पानं कायम जपलं.
तर माझी वाट लावून अप्पा गेला आणि संध्याकाळच्या सुमाराला चिवड्यासाठी मी त्याला ढुंढायला लागलो, सगळीकडं शोधल्यावर कुणीतरी तो होस्टेलच्या टेरेसवर असल्याच सांगीतल. कधी नव्हे तो अप्पा पाण्याच्या टाकीवर एकटा अन शांत बसलेला दिसला, मी कचकचून एक शिवी देऊनही अप्पा स्तब्धच होता, जवळ जाऊन पाहतो तर त्याच्या डोळ्यात पाणी. विचारल काय झालं. तर म्हणतो,
" तातेराव गेला रे लेका!!!! फाशी घेतली त्यानं शेतात, कर्जाला कटाळला होता बिचारा"
हा तातेराव त्याचा शेजारी होता आठ एकर शेतीचा मालक. मी पहिल्यांदाच त्याला अस ऑक्साबोक्सी रडतांना बघीतलं, त्याची समजूत घालून त्याला मी घेऊन आलो पण त्या दिवशी तो जेवला नाही, पुढचे दोनतिन दिवस तो खिन्नच होता.
आजही कधी जुन्या मित्र-मैत्रिणीचा अड्डा जमल्यावर मला, " मह्या ती फुपाटा कविता म्हणंना लेका"असा आग्रह होतो. कधी एखाद्या कार्यक्रमात ती कविता सादर केलीच तर तिला हमखास उत्स्फूर्त दाद मिळते. बी. रघुनाथ मोहत्सवात तर इंद्रजीत भालेराव अन लोकनाथ यशवंत काकाजींनी फुपाटाच कौतुक केल. जेंव्हा एखादा कविता ऐकून " मह्या फार्म भन्नाट आहे राव अस बोलतो तेंव्हा मी मनात म्हणतं असतो,
मी तर फक्त "अप्पा" शब्दात मांडायचा प्रयत्न केला राजेहो........
महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected