लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

घनगर्द तमातील मिणमिण

आमच्या घराच्या मागेच राहते म्हातारी. मी गेलो. आडवे तिडवे पत्रे मारलेली एक खोली. आत म्हातारी झिंगे निवडत बसली होती. पासष्टच्या वर वय असेल तिचं, ठेंगणीशी, हडकुळी, सुरकुतलेला पण तेजस्वी चेहरा, दातवन लावून काळे झालेले दात,मोकळं कपाळ, गुढघ्याच्या किंचित खाली आलेल लुगड. केसाला नेहमीच चापून चोपून तेल लावलेल.त्यात ती भरभर एकदम सुपरफास्ट रेल्वेसारखी बोलायची, मोठी उद्दमी होती म्हातारी. कधी चणे मुरमुरे कधी पपया काकड्या तर कधी झिंगे बोंबिल अस काहीही विकायची. एकटीच राहायची. एखादवेळी रस्त्यात भेटली तर आवर्जून हातावर चार बोरं,एखाद सीताफळ ठेवायची.
“आज्जे कशाला वं देती इक नं चार पैसे भेटतील तुला” मी म्हणायचो.
“अय खाय ना बापू पैसे काय उरावर घ्युन जाऊ का मी? जाय बिगि बिगी घरी अंधार झालाय काकू वाट बघत आसल.”
मला गम्मत वाटायची तिची. तिला दोन मूलं होती. पोरगी जवळच कुठ तरी दिलेली. मुलगा शहरातच जरा दूर राहायचा. पोटासाठी काहीबाही काम करायचा. त्याची बायको भांडखोर होती. तीला तिच्या घरात म्हातारी नको होती म्हणून तिनं म्हातारीला हाकलल. म्हातारी म्हणाली हात पाय घट्ट हेत अजून, कुठबी कष्ट करून पोट भरीन तुमची गरज नाही भाड्याहो. इथ प्लॉट होता तिचा चार पत्रे मारून एकटीन घर उभ केल आणि एकटीच आयुष्याशी झिट्या घेत जगतेय आता.                               “आज्जे तू एकटीच कस करते वं सगळं.?” मी एकदा नं राहवून तिला विचारलं.
मंग काय करू मरून जाऊ का? त्यो भाड्या ऐन जवानीत गेला मरून. इस अन दोन वर्स पण नवते झाले मला.लेकर एव्हडुले मंग लिंबाचा पाला पीवून पीवून लहानाचे मोठे केले दोन्ही लेकरं. पोरीला उजवल त्या भाडखावच लगन करून देल त्याची रांड सुदी नाही निघाली त्याला काय कराव आता? हातपाय चालतात तवरक काम करीन मंग जाईल मरून. देवा भगवंतान मरण चांगलं द्यावं हाल करू ने एव्हढीच विच्छा बस. तिचा पोरगा यायचा अधून मधून म्हातारी जीवंत आहे का पहायला नाही,तर तिच्या कडून पैसे उकळायला. म्हातारी मुकाट पैसे देवून त्याला वाटेला लावायची. पण एखाद दिवशी म्हातारी दारू पिऊन अंगणात येऊन लेकाला सुनेला मरून गेलेल्या नवऱ्याला आणि एकुणातच तिच्या नशिबाला मोठ मोठ्यान शिव्या द्यायची. शेजाऱ्या  पाजाऱ्याची झोपमोड व्हायची मग अश्यावेळी काका जावून तिला घरात घेवून जायचे अन झोपी लावून यायचे. सकाळी म्हातारी तशीच प्रसन्न असायची जणू रात्री काही घडलच नाही अस वागायची. कोणी विचारलच तर म्हणायची
“हेट मी कव्हा गलबला केला राती मी त जेवन करून गप झोपले व्हते”

(घनगर्द तमातील मिणमिण)

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected