लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

रविवार ची सुट्टी - जीवनाचा अनुभव

रविवार

ऑफिसची बॅग पाठीवर लटकवून सुन्नाट दुपारी उगीच पायी भटकतोय आज,यात विचित्र गोष्ट अशी की आज रविवार आहे. काही दिवस अगोदर रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असायचा आता सुट्टी म्हटलं की भीती वाटते. पोटात काहीच नाही. दीड वाजला दुपारचा. सूर्य महोदय त्यांचं आग ओकण्याच काम इमानदारीने करतायत. सकाळी चहा घेतला होता, आता पण घेतला. तंबाखू मळली गोळी दाढेत धरली. आता काय करायचं? काहीच नाही. पायांची आग होतेय. मस्तकातून गरम वाफा येतायत. बगलेत दमट घाम. पुढे एक म्हातारी भेटली, तिला आधी सुट्टे पाच रुपये दिले.ओलांडून पुढे गेलो, परत माघारी आलो जीन्स चे खिसे धुंडाळले दहा विसच्या दोन तीन नोटा निघाल्या तिच्या हातात दिल्या, म्हातारीने नोटा हातात घेऊन कपाळाला लावल्या. डोळ्यात नवजात वासराचे भाव तिच्या. क्षण दोन क्षण थांबलो मग मागच्या खिशातून पाकीट काढलं पाचशेच्या दोन शंभराच्या तीन एक दोनशेची नोट निघाली. सगळे पैसे तिच्या पुढे धरले, म्हातारी कावरी बावरी झाली मानेनच नको म्हणाली. मी जबरदस्ती तिच्या हातात सगळे पैसे कोंबले अन् झटक्यात निघालो वळून न बघता. म्हातारी बघत राहिली अवाक होऊन, मला न पाहता दिसलं ते. सगळे पैसे तर दिलेत की आपण म्हातारीला मग थंड का वाटत नाही अजून आपल्याला?? आता चहा लागला तर? बसच भाडं? पुढे चालत राहिलो तसाच. एक हॉटेल शेजारी दारूच दुकान मळकट अंगाचे दोन तीन देशप्रेमी फुटाणे खारदाणे वाल्याकडून घेत आहेत काहीतरी. तिघेही डुलताहेत मस्त. बाजूला हिरवं टीशर्ट घालून खाली पांढरा ढगाळ मळकट पायजामा घातलेला म्हातारा बसलाय पायरीवर. कपाळाला अष्टगंध लावलेला, सुस्नात, केसांना तेल चोपडून मस्त भांग पाडलेला पांढऱ्या खुरट्या दाढीचा, माळ घातलेला म्हातारा. त्याच सगळं लक्ष त्या वाईन शॉपकडं. त्याच्या डोळ्यात तहान दाटलेली दिसतेय आणि चेहऱ्यावर हतबलता. ते तीन कळकट मळकट देशप्रेमी त्याच्या जवळ आलेत अन् झिंगत हसत आम्हाला आशीर्वाद द्या बाबा म्हणत हातातले फुटाणे त्याला देऊन पायातली चप्पल काढून पटापट त्याच्या पाया पडायला लागलेत एकाएकी. गंमत च्यायला नुसती. पोटात दारु गेली की अवघ्या जगण्याची गंमत होऊन जाते.

आता चालून थकलोय अस वाटायला लागलं. मग मी खिशातून मोबाईल काढला. तर त्यात निशा फ्रेंडशिप क्लब दोस्त बनाये वाला मेसेज येऊन पडलेला. उडवला. ओला ॲप उघडलं डेस्टिनेशन टाकलं. तीनशे एंशी रुपये. बुकिंग केली. पाच मिनिट लागतील गाडी यायला. बसने गेलो असतो तर पस्तीस रुपये तिकीट लागलं असतं पण आता काय करू पैसे वाचवून. जे वाचवायला पाहिजे होतं ते वाचलं नाही अपल्याच्यान अन् कुजक्या नोटा वाचवून काय करायचं. लेकरू वाचायला पाहिजे होतं आपलं. किमान या जगात यायला तरी पाहिजे होतं पण. पण पण पण.. गपकन कळ उठली छातीत श्वास वाढला कानाशिल तापली बांध फुटून रडायला येतंय खूप अस वाटायला लागलं. पण फोन वाजला तसा भानावर आलो. सर रोड के इस साईड आईये. गेलो. कॅबचा दरवाजा उघडला एसी बंद करून काचं वर केले अन् बसून राहिलो. सिग्नल लागला अन् धावणारी गाडी थांबली. फटफट टाळ्यांचा आवाज करत एक किन्नर थांबलेल्या गाडीजवळ आला, दोन टाळ्या वाजवून माझ्यापुढे हात करत मला 'दे रे चिकने' म्हणाला. मी पॉकेट काढलं पण ते ठणठण रिकामं. कूछ भी नहीं है दीदी मी खजील होत त्याच्या समोर पॉकेट धरलं. मंद हसला तो. किंचित सजल झाले त्याचे डोळे. मायेने माझ्या दोन्ही गालावरून तळवे फिरवले त्याने. डोक्यावर हात ठेवून काहीतरी पुटपुटला डोळे बंद करून. मग दातात एक रुपयाचं नाणं धरून डोक्यावर पदर घेत परत काहीतरी डोळे मिटून पुटपुटला तो आणि ते नाणं मला देत बोलला इसको कभी खर्च नही करना. त्याने परत माझी हनुवटी एका हाताच्या ओंजळीने गोंजारली अन् अल्ला मेरे बच्चे को खुश रखना हमेशा म्हणून लगबगीने निघूनही गेला. नाकात त्याच्या हलक्या फाउंडेशन अन् पावडरीचा वास रेंगाळला अन् कानामनात त्याचे शब्द मेरा बच्चा..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected