लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

नववर्ष - कोंब फुटलेल्या मेंदूची गोष्ट भाग क्र : ३

नववर्ष

 उगवेल अशीही पहाट कधीतरी

धूळ. प्रचंड धूळ. अवाढव्य धूळ. जिकडे तिकडे सर्वव्यापी सर्वसमावेशक धूळ. टेबलावर, कॉटच्या कठड्यावर, खुर्चीवर, सेट टॉप बॉक्सवर. धुरकटलेल्या आरश्यावर धूळ. लॅपटॉपच्या किबोर्ड वर, चार्जरच्या केबलवर, टीव्हीच्या स्क्रीनवर, कपाटावर धूळ. भिंतीच्या कोपऱ्यात, फ्रिजच्या वर. सेल जाऊन बंद पडलेल्या भिंतीवरील घड्याळावर. खटरखरर करत चालणाऱ्या पंख्याच्या पात्यांवर ठसकनारी धूळ. अस्ताव्यस्त धुळकट धूळ.

आयुष्याची झालेली धूळ धूळधाण धूळ. नाकाच्या चिकट केसात अडकलेली, डोईच्या केसांना जरठराठ करणारी धूळ. भयंकर धूळ. ही धूळ जठरात भरता यायला हवी होती साली. सगळे प्रश्न सुटले असते झटक्यात. तुला धुळीची ॲलर्जी आहे. नाकातून सटासट शिंका येतात धुळीच्या संपर्कात आल्यावर. सटासट अन् फटाफट शिंका यायला हव्यात. शिंकता शींकता नाकातून मेंदूच बाहेर यायला हवा. सटकन. त्या कोपऱ्यात कोळ्याने केव्हढ जाळं विणलं. काय फसलं त्यात? पतंग? तुरुतुरु धावत येणारा धुळरंग्या कोळी. भक्ष्य पोटात जायच्या अगोदरच त्याला विरघळून टाकणारा कोळी. पोटात जायच्या अगोदरच पचन सुरू साला. 

टीचभर कोळी पैश्या एव्हढा होतो मग भिंतीवरल्या गोल घड्याळा एव्हढा मग बैलगाडीच्या चाका एव्हढा मग घरा एव्हढा मग आभाळा एव्हढा. अवाढव्य कोळी. प्रचंड अवाढव्य कोळी. थुंकतो तुमच्यावर चिकट होऊन जाता तुम्ही अन् जळायला लागता आधी वरचं मांस गळायला लागतं मग हाडं विरघळू लागतात मग अवाढव्य जबडा उघडुन कोळी तुम्हाला उदरात घेतो भाजत्या अंगान तुम्ही गडप होता त्याच्या पोटात.

बेसिनमध्ये भांडे तसेच पडलेत. चहाचं भांड वाळूनकोळ झालं. करपट केशरी पत्ती तशीच आहे चाळणीत. चाळणीवर पण धूळ. परवा सकाळी केलेल्या ऑमलेटचा तवा तसाच आहे. मचुळ वास येतोय प्लेट अन् सरेट्याचा. अंड. अंड्यातला जीव ऑमलेट होऊन पोटात. पोटातल्या ऑमलेटच परत अंड व्हावं. टणक कवच असलेलं अंड. मग त्याचा आकार वाढत वाढत जावून भसकन ते अंड पोट फाडून बाहेर यावं. भसकन सगळे आतडे बाहेर. 

किती दिवस झाले संडास घासला नाही हारपिक असून. पिवळे डाग पडलेत शिटवर. दाग अच्छे होते है. झाटाचे आच्छे  होते है. तिरमिरी येऊन उठावं अन् हाती फडका घेऊन ही सगळी धूळ झाडून टाकावी. खसखस संडास घासावा. लख्ख करून टाकावं धूळ भरलं आयुष्य. धुळीत मिसळायचं नसेल तर..,

लख्ख उजळलेली धुळविरहित सकाळ उगवावी उद्याची. दवभरलं मंद्रमंजुळ हलकं धुकं असावं आसमंतात अन् वर जर्दजहाल हसणारा तेजस्वी सूर्य.

उगवेल अशीही पहाट कधीतरी..

- महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected