लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

'अर्घ्यदानं'ला मिळालेली ही दिलखल्लास दादं...

महेंद्र कांबळे लिखित 'अर्घ्यदान' (कविता संग्रह)
अक्षरलेणं प्रकाशन, सोलापूर
मूल्य रू. ६०/-

व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात. पण ढोबळ मानाने दोन प्रकारांत 'माणूस' ह्या प्राण्याचं वर्गीकरण करता येऊ शकेल. एक - सकारात्मक विचार करणारा आणि दुसरा - नकारात्मक विचार करणारा. कठीण, वाईट परिस्थितीत असताना, चिडून, निराश होऊनही सकारात्मक व्यक्ती त्या परिस्थितीतून काही तरी चांगलं शोधतेच आणि उभारी घेते व देतेच. कविता हेही माणसाच्याच मनाचं प्रतिबिंब. त्यामुळे हे ढोबळ वर्गीकरण कवितेचंही होऊ शकेल का ? केल्यास, महेंद्रची कविता ह्या सकारात्मक दृष्टीकोनाची कविता आहे, असं मी म्हणीन. त्याच्या 'अर्घ्यदान' ह्या कविता संग्रहातील कवितांतून तो आनंद, दु:ख, नैराश्य, संताप हे सारं काही मांडतो. गुलाबी प्रेम आणि धुमसणारा विद्रोहही दाखवतो. पण ही प्रत्येक छटा तो अगदी हलक्या हाताने रंगवतो. त्यात कुठेही आकांडतांडव दिसत नाही.

'अर्घ्यदान'ची सुरुवात होते, ती शीर्षक कवितेपासूनच. नैराश्याने ग्रासलेल्या भयाण अंधारात असतानाही कवी ह्या कवितेत असा विचार मांडतो आहे की ह्याही रात्रीची पहाट होणारच आहे. तो सूर्य नवीन असणार आहे आणि त्याचे स्वच्छ मनाने मला स्वागत केले पाहिजे. कालच्या दु:खामध्ये बुडून राहून मी उद्या येणाऱ्या अगणित क्षणांना येण्याआधीच कुजवणार नाही. इथेच आपल्याला जाणवते ती तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा आवेश दर्शवणारी शैली व हाताळणी. विद्रोहसुद्धा सकारात्मक असू शकतो. विद्रोहासाठी कविता काळोखी/ बरबटलेली/ कोरडी/ रापलेली व एकंदरीतच विद्रूप असावी लागत नाही.
स्फूर्तीदायी शब्दांत महेंद्र जेव्हा -

दीप घेऊन चाल गड्या
कर एकाचं तरी आयुष्य उजळ
जरी सूर्य नाही होता आलं
तरी निदान पणती होऊन जळ

असं म्हणतो तेव्हा आपल्याला, आपल्याच पाठीवर थाप देऊन एखादा मित्र प्रोत्साहित करतोय असं वाटतं. हाच मित्र जेव्हा अगदी त्याच्या मनातली गोष्ट सांगतो की -

वेदनेवर तिची फुंकर झेलताना
म्हणावं जिकीरीला 'शुक्रिया'
हॉटेलचं बिल ती देताना
म्हणावं फकीरीला 'शुक्रिया' !!

तेव्हा छानपैकी गुदगुल्या होऊन त्याच्यासोबत एक कटिंग चहाचा 'चिअर्स' केल्याचाही आनंद मिळतो !

ह्या छोट्याश्या पुस्तकात एकूण ४७ कविता आहेत. त्यातील मला जवळजवळ सगळ्याच अत्यंत आवडल्या. तरी, 'अर्घ्यदान, टोळधाड, प्रकाश गाणं, पाऊस गाणं, आयुष्य, रानपाखरांचा थवा, कातरवेळ, सई आठवण तुझी, शुक्रीया, फुफाटा, हुरहूर, मैत्रिणीस, ती, रंग' ह्या कविता मला फारच आवडल्या.
त्याच्या कवितांत सळसळतं तारुण्य जाणवतं. त्यात कुणाला उथळपणाही जाणवेल. पण, मला चैतन्य, खळखळाट जाणवला. तरुण वयातही सामाजिक भान असल्याचं अनेक जागी जाणवतंच.
प्रत्येक परिस्थितीकडे पाहाण्याचा दृष्टीकोन, आधी म्हटल्याप्रमाणे, बहुतकरून सकारात्मक असला तरी पु.लं.च्या विनोदासारखा हसवता हसवता हळूच एखादा खूण सोडणारा चिमटा घेण्याचा गुणधर्मही अनेक कवितांत आहे. 'फुफाटा' मध्ये एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा कॉलेजमधल्या मुला-मुलींना पाहून प्रेमाची स्वप्नं पाहायला लागतो आणि हलक्या फुलक्या शैलीत, ग्रामीण भाषेत, आपले विचार मांडताना कळतच नाही कविता कधी अत्यंत गंभीर वळण घेते आणि अखेरीस -

आठ एकर कोरडवाहू वायता वायता
जाईल माई बी जिनगानी सडून
शेतकऱ्याईच्या पोराईनं
काय करावं पिरमात पडून

- असं अंगावर येणारं भाष्य करते. अश्या अनेक कवितांतील अनेक ओळी म्हणूनच मनात घर करून राहातात. आपल्याला अपेक्षित नसताना एखादा चिमटा/ कोपरखळी/ चपराक बसते आणि मग तिथंपर्यंत लिहिलेल्या साध्या सुध्या शब्दांचेही संदर्भच बदलतात अन् डोळ्यात खुपतं एक बोचरं वास्तव.

माझं मन जणू मृग
चित्त धावं तिच्यामागं
काय धावून फायदा
तिचं रूप मृगजळ
मन झालं सैरभैर
कशी कातर ही वेळ ........................... (कातरवेळ)

सई आठवण तुझी
जणु वणवा गं रानी
पारव्याच्या ओठावर
आर्त विरहाची गाणी ........................... (सई आठवण तुझी)

विराण राज्याच्या मी कफल्लक राजा
फाटक्या फकीरीतही लुटायचो मजा ........................... (भूक)

अश्या अनेक ओळी सांगता येतील जिथे आपल्या तोंडून नकळतच 'व्वाह!' निघून जातं ! पण वैशिष्ट्य हे की हा परिणाम साधताना कवी कुठेही आक्रस्ताळेपणा करत नाही. तलत मेहमूदच्या गाण्यातील तरलतेने तो आपले दु:ख मांडतोआणि ते मांडत असताना आपल्याला दिसतो त्याचा - कवीचा - चेहरा.. मंद स्मित करणारा. त्या वेळी मनात एकच विचार येतो - This man is a smiling killer... very cruel !

बहुतेक कविता ह्या शेवटाकडे एक धक्का देणाऱ्या आहेत, वळण घेणाऱ्या आहेत. ह्या शेवटापूर्वी केलेली वातावरणनिर्मिती साध्या-सोप्या व संवादात्मक शैलीत आहे. त्यामुळे कवीला अपेक्षित पार्श्वभूमी लगेच तयार होते. कविता चित्ररुपाने दिसू लागते आणि मग शेवटी येणारा धक्का काही जागी काळजाचा ठाव घेतो, काही वेळी अंगावर काटा उभा करतो तर काही वेळी चेहऱ्यावर एक स्मित रेषा उमटवतो.प्रत्येक कविता एक संपूर्ण चक्र आहे. एक प्रवास पूर्ण करून आणि करवूनच कवी कविता संपवतो, तेव्हा खरोखरच कविता वाचल्याचं मनोमन समाधान मिळतं. जसं की -

माझ्यासाठी फुलांची पखरण करताना
निदान एक फूल तरी ठेवायचंस
स्वत:च्या केसांत माळण्यासाठी !! ........................... (मैत्रिणीस)

बळीराजा कृतकृत्य
होवो हिरवी ही धरा
भुकेजल्या पाखरांना
मिळो मोतियांचा चारा ........................... (पाऊस गाणं)

'अर्घ्यदान' ह्या पुस्तकात मुक्त छंद आणि काही अक्षरछंद असे दोनच काव्यप्रकार आहेत. कवी इथे जास्त प्रयोग करत नसला तरी विषय मात्र अनेकविध हाताळतो. खूप गूढ किंवा वजनदार तत्वज्ञान ही कविता सांगत नाही.... पण पुस्तक एकदा वाचायला घेतलं की लगेच खालीही ठेववत नाही. नक्कीच आपल्या संग्रही असावा असा हा एक छोटेखानी कवितासंग्रह आहे.

धन्यवाद महेंद्र ! आणि पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा !

....रसप....
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected