लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

मोराची बायको

मोराची बायको...
“मानवी नातेसंबंधाची निरगाठ तलमतेनं सोडवणाऱ्या  आणि सुक्षत्तम मनोव्यापाराचा तळ शोधणाऱ्या गोष्टी.”

2016सालचा वाघुरचा अंक हातात पडला रात्री त्यातली एक गोष्ट वाचत पडलो होतो दिवसभर थकून आलेलो त्यामुळे डोळ्यावर अनावर झोप होती, सहज चाळतांना मांदळकरबाई नावाची कथा वाचायला घेतली अन खाडकन झोप उडाली, दुसऱ्या  दिवशी नामादा Namdev Koli कडून लेखकाचा नंबर मिळवला आणि तब्बल वीसेक मिनिट त्या लेखकाशी बोललो. तेंव्हापासून “किरण येले” Kiran Yele नावाच्या लेखकानं मला झपाटलं.
पहिल्या आठ महिन्यातच या कथासंग्रहाची आवृत्ती संपते यावरूनच या संग्रहातल्या कथांचा आवाका आपल्या लक्षात येतो. या माणसाला कथा सुचत नाहीत तर भेटतात भेटून महिनोंमहिने डोक्यात मुरत राहतात आणि मग एखाद दिवशी असह्य झाल्यावर हा लेखक उठतो आणि सगळं कागदावर उतरवतो आणि ज्या शैलीने या कथा वाचकापर्यंत पोहचवतो ती शैलीच या लेखकाचा यूएसपी आहे.
संग्रहातल्या सगळ्याच कथा दमवणाऱ्या आहेत, वेळोवेळी लैंगिक संदर्भ येतात पण त्यात कुठेही ओंगळपणा नाही. मुळात लेखकाचा पिंड कवीचा असल्यामुळे सगळ्या गोष्टीत एक झुळझुळीत   काव्यात्मता जाणवते जी आपोआप तुम्हाला झिंग आणते. माणूस नावाच्या प्राण्यात असणाऱ्या बऱ्याच आदिम प्रवृतींचा इथे वेध घेतलाय.
साइन आऊट ही पहिली कथा, virtual relationship, virtual sex हा आजच्या इंटरनेटनं दिलेला शाप म्हणा किंवा वर. चॅटिंगला चटावलेला एक माणूस एका विदेशात असलेल्या बाईत गुंततो आणि फसतो. नॉर्मल वाटणारी ही कथा शेवटाला जेंव्हा येते तेंव्हाचा एक प्रसंग, भंगलेला नायक ग्लानीत घरी येऊन झोपेच्या गोळ्या घेतो, तेव्हढ्यात शेजारी राहणारी एक प्रौढ काकू त्याला खीर द्यायला म्हणून येते त्याची अस्वस्थता तिला जाणवते आणि ती त्याला धीर देते सांत्वन मिळताच त्याचा बांध फुटतो तो  ओक्साबोक्सी रडू लागतो तेंव्हा प्रेमानं ती त्याला जवळ घेऊन थोपटते आणि तो तिच्या स्तंनांना लुचतो पण यात लैंगिकता अजिबात नाही तो लुचतो अगदी तसच जस एखाद लहान मूल आईला लुचत हे काहीतरी भन्नाट आहे.
कोपऱ्यातल टेबल ही पुस्तकातील सगळ्यात जीवघेणी कथा आहे अस मला वाटतं. मांदळकरबाईत आलेले कवितेचे संदर्भ असोत, ती आणि ती मधली प्रतिकात्मकता असो, अवशेष कथेतल्या नायिकेचा स्वतःशी चाललेला झगडा असो किंवा अमिबा आणि स्टीलग्लास मधले संवाद असोत एका एका गोष्टीवर लिहायच झालं तर पानंच्या पानं खर्ची पडतील.
शीर्षकथा असणारी मोराची बायको वाचताना तुम्हाला या लेखकाची हातोटी जाणवते त्याच्या लिखाणाचा विस्तृत परीघ अनुभवतांना आपण चकित होतो.खरतर ही एक संपन्न रूपककथा आहे आणि ही कथा लिहिताना या माणसानं खरच मरणकळा सोसल्या असतील. 
या कथेतल्या नायिकेच्या मनात मोरपुरुष असतो, मोर तिच्या स्वप्नात येत असतो त्याच्या केका तिला ऐकू येतात एव्हढच नाही तर स्वप्नात ते दोघ भेटतात आणि शब्दावीन बोलतात देखील. तारुण्यात आल्यावर ती त्याचं एक चित्र काढते, सकाळी ते चित्र तिची आई बघते आणि तिला जाणवत की ह्या चित्रातल्या मोरपुरुषाला ती ओळखते का जाणवत तिला अस? मनातलं चित्र शोधू नये दिसलं तरी जुळवून पाहू नये मनातल्या चित्रात आणि खऱ्या माणसात फरक असतोच नेहमी हे समजावणीच्या सुरात जेंव्हा ती नायिकेशी बोलते तेंव्हा लक्षात येत की तिने काय गमावलय. शेवटाला जेंव्हा मोरपुरुषाला ती भेटते, जंगलात त्याला शोधताना शरीरावरच एकेक वस्त्र, आभूषण even  पायातल्या चपलासुद्धा फेकून देते आणि ती त्याला भेटते अगदी निर्वस्त्र म्हणजे पूर्णतः नैसर्गिक अवस्थेत, ती शरीरावरची सगळी बाह्य आवरणं फेकते म्हणजे नेमकं काय फेकते ? त्याला शोधताना ती अगदी त्याच्यासारखीच केका मारत का धावते? दगडावर दगड घासून अग्नि निर्माण करून आणि ओढणीचा एकेक धागा काढून तो जाळून निर्माण होणाऱ्या प्रकाशात ती त्याला शोधते हे काय आहे नेमकं जे जाळल्यावर भवताल उजळतो आणि आपल्याला हव ते त्या प्रकाशात स्पष्ट दिसतं ? यातून लेखक जे सांगू पाहतो ते उलगडल तर कमाल भिडतं. याही कथेचा शेवट अगदी अकल्पित आहे,  मनातल्या मोरपुरुषाला ती भेटते, मोरसंग घडतो, काही वर्ष ते एकत्रही राहतात आणि एकदिवस तिला अचानक घोडयाच खिंकाळण ऐकू येतं आणि त्याच रात्री स्वप्नात तिला एक अबलख घोडा दिसतो पुन्हा एक वर्तुळ सुरू होत. का?
तर शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी अस तुकोबा म्हणतात, “फिटेस्ट टु सर्व्हायवल”, आपल्यात रुजणार बीज शुद्ध असावं, जन्माला येणारी संतती निकोप असावी अस केवळ बाईलाच नाही तर जगातल्या प्रत्येक प्राणाच्या मादीला वाटतं आणि ते स्वाभावीक आहे. तुम्ही चिम्पांझी, गोरीला किंवा काळवीटांचा कळप बघा त्यात एक dominant male असतो कळपातल्या सगळ्या माद्यांशी जुगायचा अधिकार फक्त त्याला असतो, मग एखादा प्रतिस्पर्धी येतो त्याच्याशी झगडतो आणि पहिल्या नराला हुसकून लावतो किंवा पराभूत होऊन परतून जातो जो लढाईत जिंकतो तो पुढचा dominant male. यात जो नर स्वतःला सिद्ध करतो जो मादीला बेटर जीन्स देऊ शकतो माद्या त्याच्याकडून बिजधारणा करून घेतात. समाजात व्याभिचार नावाचा प्रकार आहे, काय असत नेमकं स्त्री पुरुषाच व्याभिचारी वागणं म्हणजे? आणि काय असतो नेमका समागम किंवा संभोग म्हणजे तरी ? पुरुषाच्या बाबतीत आपल्या DNA कॉपीज नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर करण ( नर याबाबतीत लैच उत्साही असतो आणि म्हणून लैच बदनाम आहे बिचारा) आणि स्त्रियांच्या बाबतीत बेटर जीन्स मिळवण एव्हढच. एकाच जोडीदारासोबत निष्ठेन राहणं हा समाजान घालून दिलेला अलिखित नियम जरी असला तरी हा निसर्गान घालून दिलेला नियम नाहीच निसर्ग आपल्या जागी पक्का आहे आणि तो कायम राहणार. तो त्याचं अस्तित्व वेळोवेळी सिद्ध करत राहणार, माणूस नावाच्या बुद्धिजीवी प्राण्याची तारांबळ उडवत राहणार. बाबा रे तू कितीही नागर झालास तरी तुझ्या आत आदिम जंगल आहे हे सांगत राहणार. तुम्ही संस्कृती,संस्कारांची कितीही पुटं स्वतःवर चढवून घेतलीत तरी आतला निसर्ग कसा डावलणार? हा लेखक तथाकथित सभ्यपणाच्या अनरियल शोला जबरदस्त आणि जोरकस धक्का देतो.       
एकुणातच या संग्रहात अनेक सूक्ष्म कांगोरे आहेत जे उलगडताच अंगावर रोमांच उभे राहतात. सबंध  पुस्तकात लेखकान संस्कृती,संस्कार , कल्पित व्यवस्थेला आणि तथाकथित सिविलायझेशनला अवघड प्रश्न विचारून अडचणीत आणलय. तगडे संवाद हे आणखी एक ठळक वैशिष्ट म्हणता येईल संग्रहाच. कितीतरी अवघड बाबी सोप्यात सोप्या करून संवादातून सांगण्याची अद्भुत शैली आहे आहे या लेखकाची. आकृतीबंध,पात्रनिर्मिती, प्रवाहीपण,संवाद आणि प्रतिकात्मता लिखाणाच्या या सगळ्या तांत्रिक बाबी हवालदिल करणाऱ्या आहेत. तुम्ही एकेक कथा वाचतांना,संपवतांना विचारमग्न होता, अस्वस्थ होता,शहारता आणि भारावता देखील.
मराठी कथाविश्वातल खरतर हे खूप मोठ काम आहे. या कथा खूप मोठा ठेवा आहेत. पारंपारिक कथाबीजं  डावलून असली जिगरबाज मांडणी करण,अलौकिक प्रतिमासृष्टी उभारण सोप नाही म्हणून हे वेगळं आहे आणि जपण्याजोग देखील.

महेंद्र गौतम.

कथासंग्रह- मोराची बायको
ग्रंथाली प्रकाशन
मूल्य- 180 रुपये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected