लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

घनगर्द तमातील मिणमिण.

रस्त्यात अचानक सुहासिनी भेटली. तिच्या कडेवर छोटा आर्यन, हे पोर मी दिसलो रे दिसलो की चेकाळतं. आईच्या कडेवर उड्या मारत माझ्याकडे झेप घेतं. टपोर डोळ्याचं ,गोबऱ्या गालाचं सावळसं गोड लेकरू. खूपवेळा सुहासिनी त्याला आमच्या घरी सोडून कामंधामं आटपायची. शेलाट्या बांध्याची सावळी पण तरतरीत नाका डोळ्यांची रेखीव सुहासिनी.
आज आर्यनचा चेहरा मलूल होता पण. मी जवळ गेलो तसं त्यानं विझल्या डोळ्यांनी माझ्याकडं पाहिलं मी दोन्ही हात पुढं केले तसा निमूट माझ्याजवळ आला तो. अंग चांगलंच गरम होत त्याचं. मी सुहासिनीला म्हटलं "अगं ह्याला तर ताप भरलाय". 
हु म्हणत तिनं सुस्कारा सोडला.
"काकू आहे का घरी?" 
मी हो म्हटल्यावर मुकाट्यानं माझ्या मागे घरी आली. तिचाही चेहरा उतरलेलाच होता. एकोणविस वीस वय असेल तिचं. तिचा नवरा म्हणजे दाजी रिक्षा चालवायचा बऱ्याचवेळा सुहासिनी आमच्या घरी काकूसोबत गप्पा मारत बसलेली असायची तेंव्हा संध्याकाळी काम आटपून आल्यावर तिला हाक मारायला घरी यायचा. दिसायला हिरो कुरळ्या केसांचा, गोरागोमटा, भरलेली छाती आणि पिळदार दंडाचा. मस्त बोलायचा. खुप वेळा रस्त्यात भेटला की मला काकुला त्याच्या ऑटोतून घरी सोडायचा. पैसे घ्यायचा नाही.राहू द्या ना पाहुणे म्हणायचा. दीड एक वर्षा अगोदर सुहासिनी त्याच्यासोबत निघून आली इथं. त्याचं गावं काहीतरी तीसेक किलोमीटरवर होतं, कमवायला म्हणून तो या शहरात आला आणि सुहासिनीच्या घरा समोरच्या खोलीत राहायला लागला, सुहासिनीचा बापसुद्धा असाच तीस पस्तीस वर्षा अगोदर पोट भरायला म्हणून आला होता आज वस्तीत दोन खोल्याच स्वतःच घर होतं त्याचं.तिच्या मोठ्या भावानं शाळा सोडली होती अन बापाला आधार म्हणून काहीबाही कामं करायचा तोही. समोरच्या ह्या देखण्या ऑटोवाल्याशी सूत जुळलं सुहासिनीचं, कुणकुण घराला लागली अन राडा झाला. पण सुहासिनी ठाम होती, तिनं दाजीशी लग्न केलं आणि इकडं निघून येऊन संसार थाटला माहेर तुटलं तिचं.
सासू सासरेही कधी आले नाहीत तिचे इकडे , तू खालच्या जातीची आहेस म्हणून ते नाराज आहेत असं तो तिला सांगायचा. त्यानं तिला कधी गावी नेलं नाही,स्वतः आठ पंधरा दिवसांत चारदोन दिवसासाठी जाऊन यायचा. तरी खुश होती सुहासिनी आता तर आर्यन मुळं अजून खुश असायची ती . त्यांच्यात कधी भांडण झाल्याचं आढळलं नाही. लहानसहान कुरबुरी असायच्या तेंव्हा काकू किंवा शेजारची मावशी त्यांना जाऊन समजावून येत.
पण गेल्या वीसेक दिवसांपासून तिचा नवरा गावी गेला होता तो परत आलाच नव्हता घरातला किराणा संपत आलेला आणि आर्यन असा तापान फणफणलेला. त्याचा मोबाईलही बंद काही वाद नाही की भांडण नाही सुहासिनी सैरभैर झाली आणि मनाचा हिय्या करून एक दिवस सकाळीच त्याच्या गावी गेली. संध्याकाळी परत आली तेंव्हा तिचा चेहरा पांढराफटक पडलेला. डोळे सुजून लाल झालेले. तिच्या घरी न जाता ती थेट इकडेच आली होती. येउन भिंतीला टेकून बसली , काकूनं तिला पाणी दिलं.
काय झालं भेट झाली की नाही त्याच्याशी? काकूच्या या प्रश्नावर तिनं मान खाली घातली. 
फसवलं काकू त्यानं मला. त्याचं आधीच लग्न झालं होतं दोन लेकरांचा बापय तो. इकडं आला तेंव्हा बायको गरोदर होती त्याची आता ती गावी आहे राहायची सोय करतो मग तुला तिकडं घेऊन जातो म्हणत म्हणत वर्ष काढलं त्यानं म्हणूनच दर आठ पंधरा दिवसाला गावी जायचा. विचारत विचारत घरी गेले त्याच्या आणि तिथं गेल्यावर सगळं कळलं मला. हाकलून लावलं तिथून मला.
हा हादरा होता सगळ्यांना सगळे सुन्न झाले होते. काय बोलावं कुणालाच कळेना. शांत झोपलेल्या आर्यनकड एकदा तिनं बघितलं आणि डबडबत्या डोळ्यांनी परत म्हणाली त्याच्या साठी घरदार सोडलं सगळ्या आयुष्याचा खेळ करून घेतला हा दुसमन पदरात आहे नाहीतर कुठय जीव दिला असता मी...
काळजात चर्र झालं एकाएकी.
ही एकोणविस वीस वर्षाची मायमाहेर तुटलेली पोर वर्ष सव्वा वर्ष्याचा छोट्या आर्यनला घेऊन कुठं जाईल ? काय करेल आता सुहासिनी?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected