लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

झरा जिवंत असावा - : घनगर्द तमातील मिणमिण

झरा जिवंत असावा

झरा जिवंत असावा - सलग दोन तीन महिने खच्चून काम होतं.

झरा जिवंत असावा

सलग दोन तीन महिने खच्चून काम होतं ऑफिसचं,आळंदी - देहू नावाची शेवटची गाडी घरी यायला फाट्याहून पकडायची. घर आठ दहा मिनिटांवर, दुसराच स्टॉप म्हणून बसमध्ये जाऊन पुढे उभं राहायचं. त्यात एका परटिक्युलर सीटवर कायम ती बसलेली. काटकुळी, विझलेले डोळे,सावळा निस्तेज चेहरा लौकिकार्थाने असुंदर. अंगावरचे कपडे थोडेसे जुनाटच गरिबी दाखवणारे. आसक्त नजरेने सतत भिरभिर बघत राहायची. मागे उभा असलो की सतत वळून बघत असायची अन् मी मनात हसायचो. उतरल्यावर पण खिडकीतून तिचं बघणं पाहून गंमत वाटायची. मनात म्हणायचो पुरुषाची नजर बाईला कळते तशीच बाईची नजर पण कळत असते पुरुषाला मावले. बिक गया जो वो खरिदार हो नही सकता..

झरा जिवंत असावा - नंतर कामाचा भार. 

इंद्रायणी घाट
नंतर कामाचा भार ओसरला अन् घरी लवकर येणं व्हायला लागलं. रोजच्या आयुष्यात ती नजर विस्मृतीत गेली. अचानक शनिवार रविवार धरून शुक्रवारी रात्रीच जिगरी दोस्त येऊन धडकले भेटायला. सगळं अनियोजित म्हटलं आता आलाच आहात तर 'ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी' या नावाचे जिनियस जवळच असतात, हाकेच्या अंतरावर भेटवून आणतो तुम्हाला. बावाजी तुकाराम बोल्होबा आंबिले थोडेसे दूर असतात त्यांचं पुढे बघू. एकतर या लाटांमुळे भेटणं दुरपास्त म्हणून तब्बल दोन वर्षांनंतर आलेले काळीज यार. जाम खुशीचा दिवस,आळंदी पोचलो, तिथल्या इंद्रायणीच्या काठावर बराच वेळ रेंगाळत राहिलो. शंभर वर्षांपूर्वी किती नितळ स्वच्छ असेल हे इंद्रायणीचं हिरवट पाणी? हा घाट किती शे वर्षांपूर्वी बांधला असेल? असलं कायबाय बोलत प्रत्येक जुन्या गोष्टीला हात लाऊन पाहत मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आलो. वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या माणसाबद्दल नाही म्हटलं तरी सोबत्यांना पण आदर होताच. आत गेलो संजीवन समाधी डोळाभर बघत भारावून सगळं डोळ्यात साठवणाऱ्या दोस्तांसोबत मागच्या बाहेर नेणाऱ्या प्राचीन दरवाजात आलो अन् समोर प्रसाद अन् इतर वस्तू असणाऱ्या दुकानात माऊली प्रसाद घ्या म्हणणारी मलूल डोळ्यांची ती.!! चमकून माझ्याकडे दोन क्षण बघत राहिली पण यावेळी ती बसमधली नजर नव्हती तिची. दोन वर्षांपासून जिथे दिवसाला काही हजार लोक यायची तिथे आता शे तीनशे लोकं पण येणं मुश्किल,त्यात मध्ये किती तरी महिने कडकडीत बंद म्हणून आता जो तो दुकानदार काकुळतीला येऊन माऊली हार घ्या, माऊली चप्पल इथे काढा, माऊली हे घ्या ते घ्या माऊली म्हणत आधीच काळजाला चरे पाडत होता. सोबतचे दोस्त आपल्यासारखेच दर्शन हार प्रसाद अबीर वगैरे गोष्टींना अजीबात महत्व न देणाऱ्या पंथातले. मी रेंगाळलो अन् तिला विचारलं एक पाकीट कितीला? वीस म्हणाली. तिच्या हातातली दोन्ही पाकीटं घेतली, पन्नासची नोट देऊन उरलेले दहा ठेव म्हणालो तिनं लगबगीने दहाची नोट काढून हातावर ठेवली अन् एकाएकी तिचं फोन वर कुणाशी तरी झालेलं बोलणं आठवलं. म्हणजे मागच्या लाटेत गेले ते हीचे वडील. त्यांच्या पश्चात ही दुकानात येते म्हणजे जबाबदारी या एवढ्याश्या जीवाने घेतलीय घराची. रोज भल्या पहाटे सकाळच्या पहिल्या बसने येत असणार आणि रात्रीच्या शेवटच्या बसने जाते. मला दणकन भरून आलं. तिचा निस्तेज चेहरा हजार चंद्राच्या प्रकाशाने उजळलेला दिसला.मलूल डोळ्यात जगण्याची पाणीदार आशा दिसायला लागली. खर सांगतो त्यावेळी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री समोर उभी होती माझ्या. वाटत होतं तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवावा अन् गालाला एक उबदार घनघोर प्रेमाने ओथंबलेला स्पर्श करावा तिच्या..

तिकडे आत विश्रांती घेणारे एक भिंत चालवून कीर्ती दिगंतात गेलेले माऊली आणि इकडे चार भिंतींच घर चालवायला धडपडणारी ही माऊली आणि समोर तेंव्हाही अन् आताही वाहणारी संथ हिरवट पाण्याची इंद्रायणी माऊली..


"नदी पाऊल मिटते 
नको त्याचा गवगवा
बाई डोहाच्या ग आत
झरा जिवंत असावा.."


- महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected